गंगापूर, (प्रतिनिधी) : गुन्हेगारी तपासात निर्णायक ठरणारी अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात दाखल झाली आहे. या व्हॅनमुळे घटनास्थळी पुरावे नष्ट होण्याआधीच शास्त्रीय तपास पथक तात्काळ पोहोचणार असून, गंभीर गुन्ह्यांच्या तपासाला मोठी चालना मिळणार आहे. परिणामी आरोपींना कायद्याच्या कचाट्यात अडकवणे अधिक प्रभावी ठरणार आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांच्या हस्ते फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, पोहेका भागवत खाडे, राजकुमार कुकलारे, सचिन काळे, प्रथमेश भारद्वाज, रुपाली ढोले, विनोद पवार, यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी व व्हॅनमधील तज्ज्ञ उपस्थित होते.
-- घटनास्थळी त्वरित
शास्त्रीय तपास --
या अत्याधुनिक व्हॅनमध्ये फिंगरप्रिंट किट, डीएनए नमुना संकलन साहित्य, रक्त व इतर जैविक नमुने सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष उपकरणे, तसेच डिजिटल पुरावे जतन करण्यासाठी आधुनिक साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे खून, घरफोडी, अपघात, लैंगिक अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये घटनास्थळीच प्राथमिक वैज्ञानिक तपास करणे
शक्य होणार आहे.
-- पुरावे नष्ट होण्यास आळा --
आतापर्यंत काही प्रकरणांमध्ये पुरावे गोळा करण्यास विलंब झाल्याने तपासावर परिणाम होत होता. मात्र आता घटनास्थळी तत्काळ फॉरेन्सिक पथक पोहोचणार असल्याने पुरावे नष्ट होण्याचा धोका कमी होणार आहे. यामुळे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात
येत आहे.
ही फॉरेन्सिक व्हॅन गंगापूरसह देवगाव रंगारी, शिल्लेगाव व परिसरातील ग्रामीण भागातही कार्यरत राहणार आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार असल्याचे मत व्यक्त करताना नागरिकांनी घटनास्थळ अबाधित ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांनी केले आहे.












